१००० पालक येतील का नक्की सिंहगडवर ? कसं शक्य आहे ते? नेमकं काय काय करावं लागेल यासाठी ? मुलांना घेऊ द्यायचं कि फक्त पालक नेऊयात ? सर्वांसाठी मग किती गाड्या लागतील? आर्थिक नियोजन कसे करावे? यासारख्या अनेक अनेक प्रश्नांनी आम्हाला एक महिन्यांपूर्वी भांबावून सोडलं होत.
घरातून जेव्हा जेव्हा कधी फोन आले कि, "अगं कुठे आहेस"? तेव्हा तेव्हा माझं एकच उत्तर असायचं - शाळेत. घरच्यांना पडलेला गहण प्रश्न - ऍडमिशन नेमकं झालाय कोणाचं? स्वानंदीच कि स्नेहलच !
प्रबोधिनी निगडी केंद्र प्रमुख देवळेकर सर, यांच्या मनात ही कल्पना होती कि किमान १००० पालक घेऊन असं काहीतरी संघटन कराव जो महाराष्ट्रातील इतर शालेय इतिहास म्हणून लक्षात राहील. अर्थात हे घडवून आणणं म्हणजे सोपं नव्हत. त्यामागे प्रत्येक सहभागी व्यक्तीचा खूप बारीक विचार, सुरक्षितता, वातावरण,त्यांच्या जेवणा-खावणाची सोय, ने-आन करण्यासाठी ची सुविधा... या सर्व सर्व गोष्टी शिवधनुष्या प्रमाणे होत्या ज्यासाठी शेकडो हात सोबत लागणार होते. या सर्व मोहिमेची जबाबदारी अत्यंत अनुभवी व्यक्ती, म्हणजे श्री. निलेश गावडे सर आणि माझ्यावर सोपवण्यात आली. सरांसारख्या अनुभवी व्यक्तीसोबत इतक्या मोठ्या कामाची जबाबदारीचा भाग होणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होय.
१२०० पेक्षा अधिक जनसमुदा याला सिंहगडावर घेऊन जाणे आणि सुखरूप परत आणणे हेच आमचं मोठं ध्येय होत. किमान एक महिना आम्ही सर्व पालकवृंद आठवड्यातून २-३ वेळा या मोहिमेच्या कामानिमित्त सातत्याने भेटत होतो. या भव्य दिव्य कामासाठी अखेरच्या टप्यात २०० पालक एकत्रित काम करत होते.. सर्व जण आपलं कार्य म्हणून याकडे पाहत होते. खूप मोठा सहभाग, खूप मोठी मेहनत आणि एकजूट होती. अर्थात त्या साठी पालकांनी १० वर्ष एकत्रित घालवली होती आणि अनेक कार्य या अशा विविध माध्यमातून या आधी देखील पार पडली होती.
सर्वजण एकजुटीने म्हणजे अगदी शिक्षक देखील शेवटच्या दिवसापर्यंत या कामात सहभागी झाले होते. मला आठवत, कि आदल्या रात्रीचे ९ वाजले होते, जेव्हा आम्ही टी-शर्ट ची गाडी घेऊन येणाऱ्या मंडळींचे स्वागत केले आणि सकाळी ५. ३० वाजता आम्ही रिपोर्टींग ठेवलं होत.
मोहिमेची तारीख ६ मार्च,२०२२ अशी निवडण्यात आली. जागतिक महिला दिन , भारत स्वातंत्रचे अमृत मोहोत्त्सवी वर्ष आणि पालक महासंघाचे दशकपूर्ती वर्ष या तीनही मध्यबिंदू मानून आणि या दिवसांचे औचित्य साधून मोहिमेची तारीख ठरवली गेली होती.
प्रबोधिनी निगडी केंद्र प्रमुख मा. देवळेकर सर यांच्या या मनात आलेल्या विचारला आकार यायला सुरुवात झाली. हाताला हात जोडले जाऊ लागले. मोहिमेच्या प्रवेश प्रक्रियेसाठी फॉर्म सुटले. शाळेतील लहान गटा पासून ते दहावी पर्यंतचे सर्व आजी - माजी पालक, शिक्षक, विदयार्थी यांसाठी प्रवेश खुला झाला.
शाळेच्या कम्युनिकेशन चॅनेल मुले फॉर्म सर्व म्हणजे किमान ३००० पालकांपर्यंत पोहचवणे शक्य झाले. मात्र सुरुवातीला म्हणजे पहिले दोन दिवस प्रतिसाद थंड च होता. प्रवेश वाढविण्यासाठी मोहिमेतील कार्यकर्त्यांनी ठोस पावलं उचलणे गरजेचे होते, अन्यथा ५०० प्रवेश देखील अवघड वाटत होते. यासाठी संपूर्ण दोन दिवस आम्ही प्रत्येक माध्यमातील शिक्षक वर्गाला जाऊन भेटलो आणि या मोहिमेची संकल्पना , विचार पोहचवला. प्रत्येक वर्गातील शिक्षकांना हा मेसेज प्रत्येक पालकांपर्यंत पोचवण्याची विनन्ती केली. तसेच आम्ही देखील ऑनलाईन च्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमांच्या पालकांशी बोलून या आवाहन केले. त्या संध्याकाळ पासून प्रवेशिका वाढल्या, शाळेतील पालकांमध्ये चर्चा होऊ लागल्या, महिला पालकांचे शाळे बाहेरील चर्चेच्या विषयात 'सिंहगड मोहीम' या विषयाच्या गप्पा रंगू लागल्या.. बघता बघता दोन दिवसात ८०० पेक्षा अधिक प्रवेश आले. आता आपण थांबू .. आणखी प्रवेश नको असे म्हणे १००० चा आकडा ओलांडला गेला. तरी हो नाही करत १३०० वर आम्ही थांबलो .

आता पुढे आव्हान होत ते म्हणजे या सर्वांना पुढील सूचना आणि मार्गदर्शन कि जेणे करून मुख्य कार्यक्रम सुरळीत आणि विना अडथळ्यांचा होईल. त्याच काळात इतकी लोक गडावर तर येतील पण त्यांच पुढे काय ? या मोहिमेचा हेतू ? या मोहिमेचे उद्दिष्टय याचा विचार डोक्यात घुमू लागला. या सर्व प्रयोजनामागे एक विचार होता.... एक ध्येय होत... एक उद्देश होता.... मोठ्याघटना घडण्यासाठी मोठे विचार त्याला कारणीभूत ठरतात. .. या सर्वविचारांना एक दिशा देवळेकर सरांनी दिली आणि मोहिमेचे उद्देश ठरल. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या स्वराज्य तर स्थापन केले, पण त्याचे सुराज्य आज आहे का ? हा प्रश्न अजूनही सर्वांना सतावतो. म्हणून, या मोहिमेच्या मदतीने आम्ही सर्व संघटित होऊन स्वराज्याचे सुराज्य व्हावे हा विचार घेऊन पुढे आलो आणि या संपूर्ण मोहिमेचे नाव ठेवण्यात आले - सुराज्याची पाईक आम्ही!
या विचारावर आधारित सध्य भेडसावणारे जागतिक प्रश्न म्हणजे - पर्यावरण समतोल , प्लास्टिक वापर , तापमान वाढ ! यासाठी काही विचार इतक्या मोठ्या जन समुदायात रुजवता येईल का हा विचार झाला.
यातून या मोहिमेचे शिल्पकार मा. देवळेकर सर यांनी गडावर काही वेळ औपचारिक कार्यक्रम व्हावा ही इच्छा प्रकट केली. सोहळ्याला अनुसरून प्रमुख पाहुण्यांची नावे देखील पुढे आली.त्यांना समक्ष भेटून आमंत्रण करण्यात आली. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे मा. अविनाश धर्माधिकारी यांना या निमित्ताने प्रत्येक्ष भेटण्याचा योग्य आला. हे माझे भाग्यच ! कार्यक्रम पत्रिका सादर झाल्या.
इतक्या लोकांना गडावर घेऊन जाणे आणि आण्यासाठी सिंहगडाच्या राज मार्ग म्हणजे कल्याणपेठ (कल्याण दरवाजा) मार्ग ठरला. याचे कारण असे कि , या मार्गाला अजिबात गर्दी नसते, या मार्गाने कोणीही ये-जा करत नाही. त्यामुळे संपूर्ण मार्गावर केवळ शाळेचा जन-समुदाय राहील. कल्याण दरवात उभे राहिले असता शेवटचा टप्पा अगदी सहज नजरेस पडतो. मी आणि माझ्या सोबत निलेश गावडे व नवनाथ नरळे यांनी सर्वात आधी जाऊन प्राथमिक पाहणी केली. तिथे १००० लोकांच्या जेवणाची व्यवस्था कोणत्या ठिकाणी करता येईल, मुख्य कार्यक्रम कुठे घेता येईल, विदयार्थी पालक यांचा वावर नेमका कुठे कुठे राहील आणि सुरक्षितता या सर्व बाबींचा बारकाईने विचार केला गेला. या सर्वांमध्ये अगदी मोठं आव्हान होत ते म्हणजे इतक्या लोकांना मार्च महिन्यातील १२ च्या उन्हात नेमकं बसवायचं कुठे?
त्यासाठी २ जागा निवडण्यात आल्या. आम्ही निवड केलेल्या जागेची पुनः पाहणी करण्यासाठी आम्ही परत ३ दिवसांनी आणखी काही जणांना घेऊन गडावर आलो आणि ठरलेल्या सर्व जागा म्हणजे जेवण, मुख्य कार्यक्रम आणि गड चढाई - उतराई यांवर मोठया मताने शिक्का मोर्तब झाला.
५ मार्चच्या रात्री १० वाजेपर्यंत पालक, शिक्षक आम्ही सगळे शाळेत मध्ये शर्ट, टोप्या वाटप ची जबाबदारी पार पाडत होतो. सगळ्यांचा अनुभव एकाच आम्ही झोपलोच नाही. ..
६ मार्च दिवस उजाडला. प्रमुख म्हणून आम्हाला इतरांपेक्षा लवकर शाळेत पोहचायचे होते. आम्ही पोहचलो. ठरल्या प्रमाणे ३२ बस चे नियोजन झाले होते, सर्व बसेसक्रमांकानुसार रांगेत उभ्या होत्या. शाळेतील सर्व गेट वर बस प्रमुख आपल्या क्रमांकाचे झेंडे घेऊन ३०-३५ लोकांचे नेतृत्व करत होते. एकंदर पहाटेच्या वेळी शाळेत पालकांची शिस्तबद्धता पाहावयास मिळाली.
प्रथेप्रमाणे पहिल्या बस ची पूजा आणि प्रार्थना करून, सर्वांना नास्ता वाटप करून, लाईन मध्ये सर्व पालक आपापल्या बस मध्ये बसले. बसमध्ये गणपती बाप्पा मोरया या आरोळीचा आवाज दुमदुमत होता. एका मागोमाग एक बस शाळेच्या आवारातून मार्गस्थ झाल्या.साधारण ८ च्या सुमारास आम्ही सिंहगडाच्या पायथ्याशी पोहचलो. गटाचे गटप्रमुख अतिशय उत्तम प्रकारे त्या त्या गटाचे व्यवस्थापन बघत होते.आमच्या मोहिमेला सुरुवात झाली. आतिशय उत्साहात, आनंदात आणि जल्लोषात सुरुवात झाली. पालक,शिक्षक तसेच विद्यार्थी घोषणा करत गड चढत होते.अगदी शिशुवर्गाच्या चिमुकल्यांपासून ते दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत या मोहिमेत मुले सहभागी होती. गढ चढताना विशेष नवल या गोष्टीचे वाटले की एकमेकांची ओळख नसताना प्रत्येक पालक, शिक्षक एकमेकांची विचारपूस करत होते.या सर्व जल्लोषात,आनंदात आम्ही कल्याण दरवाजा ने सिंहगडावर पोहचलो.

किल्ले सिंहगड मोहीमे दरम्यान एका ठिकाणी आपल्या भारत देशाचे दर्शन झाल. आपला देश जसा विविधतेने नटलेला आहे त्याची प्रचिती काल जेंव्हा आपले पालक गड चढून येत असताना आली.विविध वयोगटातील मुले,त्यांचे पालक,शिक्षक,सेवक सगळे जण एकत्र होऊन फक्त ज्ञानप्रबोधनी शाळेने योजिलेल्या उपक्रमाला यशस्वी होण्यासाठी मनापासून प्रयत्न करत होते व त्यात ते १००% यशस्वी झाले.
ठरल्याप्रमाणे ठीक सकाळच्या ११ वाजता औपचारिक कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी प्रमुख अभ्यागत म्हणून माजी सनदीअधिकारी (आयएएस) आणि पुणे ज्ञानप्रबोधिनीचे माजी विद्यार्थी श्री अविनाश धर्माधिकारी, केंद्रप्रमुख, श्री मनोज देवळेकर, इतिहास अभ्यासक मोहन शेटे आणि नंदू मते सर यांच्या सह अनेक विविध क्षेत्रातील मानांकित, शाळेचे पालक बंधू- भगिनी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शाहीर अशोकजी कामथे सर यांच्या शूर सेनानी सुभेदार तानाजी मालूसुरे यांच्यावरील पोवाड्याने झाली. कामठे सरांच्या पोवाड्याने सर्वांना हुरूप चढला. त्यांनी गायलेल्या लढाईच्या वर्णनातून काहींचे डोळे पाणावले. सर्वाना त्यांनी बलिदानाचे मोल पटवून दिले. हे सर्व मी व्यासपीठावर बसून पाहत होते.
आदित्यदादा शिंदे यांनी या ऐतिहासिक भव्य सोहळ्याचे भूमिका विशद करणारे प्रास्ताविक केले,त्यानंतर मोहन शेटे सरांनी सिंहगड परिसराचा इतिहास सर्वाना उलगडून सांगितला. सिंहगडचे अभ्यासक नंदू मते यांनी अभ्यासक दृष्टीने सिंहगड पाहावा यासाठी मार्गदर्शन केले. तसेच, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शीतल कापशीकर यांनी पोवाड्यातून सर्व क्षेत्रातील नामवंत भारतीय महिलानां, रणरागिणींना मानवंदना दिली.
प्रमुख पाहुणे श्री अविनाशजी धर्मार्धिकारी यांनी या विशेष मोहीमेचे कौतुक करून आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला मिळवून दिलेल्या स्वराज्याचे सुराज्य व्हावे अशी आशा व्यक्त केली. त्यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत पालकांसाठी केलेले मार्गदर्शन मोलाचे होते. जमलेल्या १००० पालकांना सुराज्यासाठीची आपली भूमिका काय असावी यावर बहुमूल्य असे मार्गदर्शन देखील केले. सर्व सहभागी पालकांनी भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा आनंद साजरा करत जागतिक पर्यावरण, संघटन आणि महिला सन्मान या मूल्यांवर आधारित शपथविधीचा संकल्प केला.या संपूर्ण सोहळ्याचा मानबिंदू म्हणजे सचिन संकपाळ यांनी नियोजनबद्ध केलेला शेवटचा क्षण! कार्यक्रमातील मुलांना व पालकांना सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे शेवटचा विलक्षण क्षण छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांच्या मावळ्यांबरोबर झालेले आगमन. अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग होता. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांचे तुतारीच्या निनादात झालेल्या आगमनाने कार्यक्रमात खऱ्या अर्थाने जीव ओतला आणि सर्वाना इतिहासकाळात नेऊन ठेवलं. त्या वेळी त्या क्षणी सर्व भारावले. केंद्रप्रमुख श्री देवळेकर यांनी समारोप केला. संपुर्ण ऐतिहासिक सोहळ्याचे तडफदार सूत्रसंचालन शिवराज दादा पिंपुडे यांनी केले.

मुख्य कार्यक्रमानंतर सर्वांच्या भोजनाची उत्तम सोय गडावर करण्यात आली होती. या सोहळ्यातील अत्यंत आव्हानात्मक प्रसंग म्हणजे इतक्या लोकांचे जेवण गडावर घेऊन येणे. किमान ३० पालक या कार्यासाठी नेमले गेले होते. २०-२५ मोठाले या नेमलेल्या गटाने सिंहगच्या पार्किग पासून ते मुख्य कार्यक्रमाच्या मागच्या बाजूस म्हणजे मैदानात आणण्यास फार मोठं काम केले. सर्वांसाठी आलेल्या विविध पदार्थानी पातळ भाजी, पोळ्या, भात, दही, काकडी-गाजर यांनी ताट सजल होत. चविष्ट अशा भोजनाने सर्वांची मने आणि पोटे तृप्त झाली होती. सर्व पालक आणि मुलांनी काही वेळ कुटुंबासोबत गडावर घालवला.
वेळेचे भान ठेवून परतीचा प्रवास चालू झाला. क्रमाक्रमाने गट उतरायला सुरुवात झाली. त्यात देखील शिस्त बद्धता होती. शेवटचा व्यक्ती सुखरूप खाली आली तेव्हा साधारण संध्याकाळचे ६. ३० वाजले होते. बस मधील सर्व सुखरूप आले आहेत याची खात्री करून एक एक बस क्रमाक्रमाने रांगेत सोडण्यात आल्या. बस सुटण्या अगोदर प्रत्येकास एक पाण्याची बाटली आणि एक वडापाव याची सोय देखील पालक महासंघाने केलेली होती. इतकं बारीक नियोजन यात होत.
या संपूर्ण मोहीमेस ज्ञान प्रबोधिनी पालक संघाचे अध्यक्ष विजयराव नाईक यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले,तसेच उपाअध्यक्ष शंकर घोलप यांची मोलाची साथ लाभली. सोमशंकर डाके यांनी सर्व हिशोब अगदी अचूक पद्धतीने ठेवला. प्रीतम महाजन, सुषमा बागवडे , प्रसाद दगडे यांनी या सिंहगड मोहिमेत मोलाचे सहकार्य केले.
दुसऱ्या दिवशी सहभागी पालकांचे मोहिमेबद्दलचे प्रेम, विचार आणि शाबासकीच्या प्रतिक्रियांनी मोबाईल सतत वाजत होता. पालक बोलू लागले. ते अजूनही मनाने सिंहगडाच्या मोहिमेतच होते. .. अनुभवत होते ते सोहळ्याचे उत्स्फुर्त क्षण ....
काही पालकांच्या प्रतिक्रिया
'जे जे हाती घ्यावे,पूर्णत्वासी नेऊन ठेवावे' अशी ही सिंहगडाची मोहीम पालक महासंघाने उचलून धरली आणि सुस्वरूप,सुखरूप पूर्णत्वास नेली. एवढी माणसं गडावर घेऊन जाणं आणि सुखरूप घरापर्यंत आणण तस जिकिरीचं काम, तरी सुरुवातीपासून वेळेचं नियोजन छान ठेवलं. या मध्ये प्रत्येक व्यक्ती या संपूर्ण साक्षीदार होते.
एकमेकास सहाय्य करू,अवघे धरू सुपंथ!असा छान अनुभव आला. यामागे असंख्य हात तळमळीने झटत होते त्या सगळ्यांच मनःपूर्वक खूप कौतुक. काही दिवस भारावलेले असतात तसा कालचा गेला अस मनापासून वाटत. प्रबोधन नेमकं कस होत,तर ते अस तळमळीनं झटणारी माणसं जोडली गेली की होतं, असंख्य माणसांची सकारात्मक विचार प्रवाहाची ऊर्जा एकत्र काम करू लागली की होतं हे महासंघाने लक्षात आणून दिलं. इतका मोठा कार्यक्रम तडीस नेणाऱ्या, कार्यरत असणाऱ्या प्रत्येकाला मनःपूर्वक
त्याच दरम्यान अवघड अश्या वाटेवर सर्वजण गड चढत असताना जणू आपला भारत देशच सिंहगडावर मोहिमेसाठी आला होता असे नकळत वाटून गेले.
Comments
Post a Comment